अमरावती : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरवरून अकोल्याकडे जाणारी भरधाव कार उभ्या कंटेनरला धडकली. या घटनेत कारमधील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत. हा अपघात आज(दि.२८) दुपारी १२ वाजता धामणगाव रेल्वे नजीक घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर धामणगावजवळील चॅनल क्रमांक १०६ नजीक हा अपघात घडला. मृतांमध्ये आरती जीवने (४०), भास्कर महादेव जीवने (५७), महादेव जीवने (४२), त्रिशा जीवने (१२) व लता महादेव जीवने (४३, सर्व रा. डीएड कॉलेजजवळ, बाहुपेठ, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. हे सर्व जण चंद्रपूरवरून अकोला येथे एका कार्यक्रमाला जात असताना उभ्या कंटेनरला त्यांच्या वाहनाने धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्तांना धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे समजते. मृतांमध्ये आई वडील, मुलगा सून व नातीचा समावेश आहे.